देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत देऊळगाव मही शहरासाठी सुमारे ५ कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय अनास्था आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल पाच वर्षे उलटूनही योजना पूर्ण झालेली नाही. परिणामी शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (२९ जून) थेट पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन छेडले.
आज सकाळी ८ वाजेपासून ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत आणि अनंता इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कारभारी देढे, सागर रोतळे आणि हरि शिंदे यांनी फिल्टर प्लांटवरील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांची धावपळ उडाली. घटनास्थळी तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित….
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा बनकर, कनिष्ठ अभियंता आकाश कचरे आणि भूषणकुमार आडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रशासनाची प्रमुख आश्वासने…
लेखी आश्वासनानुसार—
देऊळगाव मही शहरातील अपूर्ण राहिलेली सुमारे ५.५ किलोमीटर पाईपलाईन व इतर त्रुटींची कामे २ जुलैपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात येतील.
फिल्टर प्लांटच्या टाकीपासून गावाच्या वेशीपर्यंत १४० मिमी ‘रायझिंग मेन’ पाईपलाईन तातडीने पूर्ण केली जाईल.
शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था पूर्णपणे सुधारून नियमित करण्यात येईल.
यावेळी सरपंच वसुदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी वसंतराव चेके, शेख जुल्फिकार, माजी सरपंच रामा म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
















