मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर तिची गर्भधारणा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह मुलीच्या आई-वडिलांविरुद्ध पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १७ वर्षे ३ महिने वयाची असून तिचा विवाह १० मे २०२५ रोजी ती अल्पवयीन असतानाच नातेवाइकांच्या संमतीने व धार्मिक रीतिरिवाजानुसार शेख आफताफ शेख अब्दुला (रा. भारत नगर, नाशिक) याच्याशी लावून देण्यात आला होता. विवाहानंतर ती पतीसोबत नाशिक येथे राहत होती. या काळात पतीसोबत शारीरिक संबंध आल्याने ती गर्भवती झाली.
काही दिवसांपूर्वी पीडिता मलकापूर येथे आई-वडिलांकडे आली होती. गर्भधारणेची तपासणी करण्यासाठी ती आईसोबत वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालयात गेली असता, तपासणीदरम्यान ती अल्पवयीन असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने मलकापूर शहर पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर पती शेख आफताफ शेख अब्दुला तसेच पीडितेचे आई-वडील शेख हुसेन शेख धासू व आप्रोजाबी शेख हुसेन (रा. कुरेशी नगर, पारपेठ, मलकापूर, मूळ नाशिक) यांच्याविरुद्ध पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची नोंद सहाय्यक पोलिस फौजदार शेख आसिफ यांनी केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.













