Advertisement Advertisement

धक्कादायक…! एक-दोन नाही, थेट ६० तासात ११ मुली बेपत्ता; बुलढाण्यात भीतीचं सावट!

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात गेल्या अवघ्या ६० तासांत तब्बल ११ तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातच आता जलंब, नांदुरा आणि लोणार या तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दोन तरुण महिला आणि एका दिव्यांग महिलेच्या बेपत्ता होण्याच्या ताज्या घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत मोरगाव (ता. शेगाव) येथील अंजली भागवत कुटाफळे (वय २१) ही तरुणी २ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता घरातून बाहेर पडली. मात्र, ती अद्याप परतली नसून तिचा शोध घेण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. गोरा रंग, सुमारे ५ फूट उंची आणि अंगात काळा टी-शर्ट, अशी तिची ओळख सांगण्यात आली आहे.

दरम्यान, नांदुरा शहरात घडलेली घटना अधिकच हृदयद्रावक आहे. कविता उर्फ रूपाली ऋषिकेश वक्टे (वय ३०) ही महिला आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, शाळा सुटल्यानंतरही ती घरी परतली नाही. तिचा मोबाईल बंद असून नातेवाइकांकडेही काहीच माहिती मिळालेली नाही. भरवस्तीतून महिला बेपत्ता होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

तसेच, लोणार शहरातील आझाद नगर परिसरातून शबानाबी शेख शब्बीर (वय ३६) ही मूकबधिर महिला बेपत्ता झाली आहे. ती रोज गोधड्या शिवण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होती. बोलता येत नसल्यामुळे तिचा शोध घेणे अधिकच कठीण बनले असून तिच्याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत मिसिंग दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे. मात्र, सलग वाढणाऱ्या बेपत्ता घटनांमुळे पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. केवळ नियमित तपासाऐवजी विशेष तपास पथकाची नियुक्ती, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि संशयित टोळ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!