सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) तालुक्यातील ऐतिहासिक आडगावराजा येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला आता गती मिळाली असून, १९ जून रोजी धार्मिक वातावरणात मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार मनोज कायंदे यांनी मंदिराचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नसल्याची ठाम ग्वाही दिली.
मंदिराचे बांधकाम प्राचीन स्थापत्यशैलीनुसार संपूर्ण दगडी स्वरूपात करण्यात येणार असून, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून आवश्यक निधी मंजूर करून आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे आ. कायंदे यांनी सांगितले. रेणुका माता मंदिर हे गावाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असून, त्याचे मूळ वैभव कायम राखत दर्जेदार जीर्णोद्धार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आडगावराजा गावाशी असलेले ऋणानुबंध व्यक्त करत मंदिरासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार तोताराम कायंदे यांनी श्रद्धा, एकजूट आणि समर्पणाच्या बळावर हे धार्मिक कार्य यशस्वी करण्याचे आवाहन केले. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सविता संजय पाटील यांनीही मंदिरासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आळंदी येथील साधक आश्रमाचे उत्तराधिकारी डॉ. यशोधन किसन महाराज साखरे यांनी मंदिराचे पावित्र्य आणि ऐतिहासिक स्वरूप जपत जीर्णोद्धार करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर मान्यवरांच्या हस्ते रेणुका मातेच्या जयघोषात मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष भागवत राजे जाधव, विश्वस्त प्रतापराव जाधव, भागवत वाघमारे, विजय राजे जाधव, नरसिंग राजे जाधव, राजेंद्र आढाव, रुस्तम झोरे, शशिकांत जाधव, सुनील अहिरराव, अतिश राजे जाधव, दीपक राजे जाधव यांच्यासह राजे जाधव परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














