मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): वडगाव–पुन्हई मार्गावर अचानक रस्त्यात आलेल्या रोही (हरिण) या वन्यप्राण्याला दुचाकीची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सारोळापीर येथील कोतवालाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात रोही देखील जागीच ठार झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (१३ जुलै) दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, सारोळापीर येथील कोतवाल सागर वासुदेव बावस्कर (वय ३५) हे सोमवारी दुपारी सुमारे २.३० वाजता दुचाकीने मोताळा येथून आपल्या गावी परतत होते. गावापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर, वडगाव–पुन्हई मार्गावर अचानक एक रोही (हरिण) रस्त्यावर आल्याने त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सागर बावस्कर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात धडक बसलेला रोही हा वन्यप्राणीही घटनास्थळीच मृत झाला.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिक कोकाटे, वनपाल प्रल्हाद साळोख, वनरक्षक बी.एच. घुगे, आर.डी. राठोड तसेच वनमजुरांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. म्हस्के यांच्या वतीने कक्षसेवक दिपक निमकर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.










