चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डिझेल मिळण्यात येणाऱ्या अडचणी गंभीर बनल्या होत्या. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनाशिवाय डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेती मशागती, पेरणी, ट्रॅक्टर व पंपासाठी डिझेल मिळवताना शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर आ. श्वेताताई महाले यांनी पुढाकार घेत प्रशासनाला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू केला.
डिझेल टंचाईचा प्रश्न केवळ पत्रव्यवहारापुरता मर्यादित न ठेवता आ. महाले यांनी संबंधित अधिकारी आणि पेट्रोल पंप चालकांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत डिझेल टंचाई, साठेबाजी, खोटे ‘नो स्टॉक’ फलक तसेच शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र अपेक्षित तोडगा न निघाल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना पत्र पाठवून अधिकृत बॅरल व कॅनमधून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी केली.
शेतीच्या कामांसाठी डिझेल अत्यावश्यक असताना पंप चालकांकडून वाहनाशिवाय इंधन न देण्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे आ. महाले यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनही सक्रिय झाले असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांनी २२ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त पथके तैनात करण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देणे, सर्वसामान्य ग्राहकांना सुलभ इंधन पुरवठा करणे, साठेबाजी व खोट्या ‘नो स्टॉक’ फलकांवर कठोर कारवाई करणे तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय एसडीओ, तहसीलदार आणि डिवायएसपी यांनी दररोज पेट्रोल पंपांना अचानक भेटी देऊन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेण्यापासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यापर्यंत आ. श्वेताताई महाले यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात सुरळीत डिझेल पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.













