Advertisement Advertisement

देऊळगाव राजा बायपासवर भीषण अपघात; दुचाकीवरील दाम्पत्याचा दुर्दैवी अंत…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील जालना बायपास मार्गावरील श्रावणी लॉन्ससमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्धन सुभाष भोपळे (वय २४, रा. देऊळझरी, ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कायम अपघात क्रमांक २१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही दुर्घटना १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादीचे वडील सुभाष आनंदा भोपळे व आई चांगुणाबाई सुभाष भोपळे हे धायडी (जि. जालना) येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी मोटरसायकल क्रमांक एमएच २० बीजे ८०८६ ने देऊळगाव राजा मार्गे जात होते.

दरम्यान, जालना बायपासवरील श्रावणी लॉन्ससमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चांगुणाबाई भोपळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सुभाष भोपळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस करीत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ विनोद गवई यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!