देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील देऊळगाव मही परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर विष्णु डोळझाके (रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ते मित्रासोबत परिसरात उभे होते. त्यावेळी विठ्ठल भगवान डोईजड (रा. देऊळगाव मही) हा तेथे आला. यावेळी जुन्या वादावरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत “तू आमचे पाहुणे पांडुरंग गोरे यांना का मारले?” असा आरोप केला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने हातातील ब्लेडने शंकर डोळझाके यांच्या डाव्या हातावर वार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
घटनेनंतर जखमी शंकर डोळझाके यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख हे ठाणेदार ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.














