Advertisement Advertisement

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची धरणात उडी घेऊन आत्महत्या! राहेरा येथील घटना…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राहेरा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४६ वर्षीय शेतकऱ्याने धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवार, १० मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव बबन देविदास जाधव (वय ४६) असे आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावावर सुमारे अडीच एकर शेती होती. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र सततची नापिकी, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच खाजगी पतसंस्था व इतर मिळून सुमारे पाच लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते.

कर्जाची परतफेड कशी करावी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या विवंचनेतून त्यांनी राहेरा शिवारातील धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. ही घटना रविवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दुपारी २ वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!