Advertisement Advertisement

तुपकरांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला शेतकरी -शेतमजूरांचा जोरदार प्रतिसाद..!गेल्या अकरा दिवसांपासून रविकांत तुपकरांच्या पायाला भिंगरी.. ४ डिसेंबर च्या बुलडाण्यातील एल्गार महामोर्चाकडे राज्याचे लक्ष..!

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी शेतमजूर भूमिहिनांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अकरा दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर जिल्ह्यात पायाला भिंगरी लावून दिवस रात्र फिरत आहेत. गाव-खेडे, वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत दुष्काळ संघर्ष यात्रा जिल्हाभर फिरत आहे. या संघर्ष यात्रेला गावोगावी प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. घाटावर चिखली,मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा या तालुक्यांमध्ये दुष्काळ संघर्ष यात्रेत दररोज हजारो शेतकरी सहभागी होऊन ४ डिसेंबर रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक ठरविण्यासाठी एकजूट दाखवत आहेत. त्यामुळे आता बुलढाणा येथे होऊ घातलेल्या या एल्गार महामोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यातील शेतकऱ्यांची मुलुखमैदानी तोफ रविकांत तुपकर यांनी दुष्काळ संघर्ष यात्रा सुरू केली आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या मलकापूर येथील स्मारकाला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात झाली होती. गेल्या दहा दिवसांपासून ही यात्रा जिल्हाभर फिरत आहे. या दरम्यान गावोगावी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, माय-माऊली तसेच युवकांसह वृद्धांचाही मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळत आहे.

ही संघर्ष यात्रा केवळ दुष्काळी मदत मिळावी, सोयाबीनला भाव मिळावा, पीकविमा, पीककर्ज या प्रश्नांसाठी नसून गावगाड्यातील शेतकरी, शेतमजूर वाचला पाहिजे, त्यामुळे त्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांसाठी ही संघर्ष यात्रा आहे. पद, प्रतिष्ठा, पक्ष आणि राजकारण सोडून शेती आणि मातीसाठी एकत्र या, असे आवाहन रविकांत तुपकर यात्रेदरम्यान करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला गावोगावी प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ही यात्रा लक्षवेधी ठरत आहे.

२२ नोव्हेंबर रोजी उकळी, सुकळी, मेहकर, अंजनी, अंथरूड, वरुड, घाटपुरी, टेंभुर्णी, खेड, विश्वी, जनुना, पांगरखेड, बेलगाव, गोहोगाव, तांदळे, तर २३ नोव्हेंबर रोजी भुमराळा, आरेगाव, जवळा, चिंचोली बोरे, वडगाव तेजन, शाळा, देऊळगाव कुंभार, चिंचोली सांगळे, पारडा, दराडे, येवती व झरा या गावांना संघर्ष यात्रेने भेट दिली. यातील भुमराळा व गोहोगाव दांदडे या दोन ठिकाणी विराट सभा पार पडल्या. या सभेला शेतकरी, शेतमजूर, युवक तसेच महिला व आबालवृद्धांची प्रचंड मोठी उपस्थिती होती. ४ डिसेंबर रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक ठरेल, या मोर्चाला आम्ही उपस्थित राहू, अशी ग्वाही यावेळी सर्वांनी दिली.

गावागावातून मदत निधीचा ओघ..!

रविकांत तुपकर यांनी जिल्हाभर सुरू केलेल्या संघर्ष यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिवाय गावागावातून मदत निधीचाही ओघ सुरू झाला आहे. तुपकर यांनी पांगरखेड तेली येथील आपले जिवलग सहकारी स्व. संदीप नालिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता, त्यांच्या मातोश्री आणि बंधू दीपक नालिंदे यांनी संदीपभाऊंच्या स्मृतीप्रित्यर्थ दुष्काळ संघर्ष यात्रेसाठी ११ हजार रुपयांचा निधी दिला. यासोबतच आरेगाव येथील संतोष धोंडजी टाले यांनी २,१०० रुपये, माजी सरपंच शंकरराव टाले यांनी १,१०० रुपये, संजय दत्तात्रय टाले यांनी १,१०० रुपये, तर गोहोगाव दांदडे येथील डॉ. वसंत बोरकर यांनी ११ हजार रुपयांचा निधी दुष्काळ संघर्ष यात्रेसाठी दिला.

ही मदत केवळ आर्थिक योगदान नाही, तर आमच्या संघर्षावर आणि शेतकरी चळवळीवर दाखवलेला विश्वास आहे आणि हाच विश्वास घेऊन शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्काचा लढा अधिक ताकदीने सुरू ठेवू, असे प्रतिपादन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!