बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात जाण्या-येण्याच्या रस्त्यावरून सुरू असलेला जुना वाद अखेर हाणामारीपर्यंत पोहोचला. चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी शिवारात शेतरस्त्याने जात असलेल्या चुलत भावाला अडवून शिवीगाळ करण्यात आली. वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले आणि विळ्याने पोट, डावी कंबर व हातावर वार करून एकाला जखमी करण्यात आले. एवढेच नव्हे, तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या भावालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकिशोर भगवान वाघ (वय ४२, रा. अंत्रीकोळी, ता. चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंत्रीकोळी शिवारातील गट क्रमांक १३३ मध्ये त्यांची वडिलोपार्जित २४ आर शेतजमीन आहे. या शेतात जाण्या-येण्यासाठी चुलत भाऊ बळीराम कडुबा वाघ यांच्या गट क्रमांक १३२ मधून पूर्वीपासून शेतरस्ता आहे. मात्र, बळीराम वाघ या रस्त्याने जाण्यास विरोध करीत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शेतरस्त्यावर अडविले अन् विळ्याने वार!
२२ नोव्हेंबर रोजी सकाळी नंदकिशोर वाघ आणि त्यांचे भाऊ अनिल भगवान वाघ हे शेतात जात असताना बळीराम वाघ याने त्यांना रस्त्यात अडविले. ‘या रस्त्याने का जाता?’ अशी विचारणा करीत वाद घातला. हा वडिलोपार्जित रस्ता असल्याचे नंदकिशोर यांनी सांगताच आरोपीने शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर विळ्याने नंदकिशोर यांच्या पोटावर, डाव्या कमरेवर आणि हातावर वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, भावाला मारहाण होत असल्याचे पाहून अनिल वाघ हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले. मात्र, त्यांनाही शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शेतात जाण्याच्या रस्त्यावरून सुरू असलेल्या चुलत भावांमधील वादाने अखेर हिंसक वळण घेतल्याने परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.













