Advertisement Advertisement

मेहकरमध्ये काळाचा घाला! एकाच घरातील सासू-सुनेचा अवघ्या ४ तासांच्या अंतराने मृत्यू; एकाच दिवशी एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): काळाचा घाला कधी आणि कुणावर पडेल, याचा नेम नसतो. मेहकर शहरातील गणपती गल्ली परिसरात अशीच काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. एकाच कुटुंबातील सासू आणि सुनेचा अवघ्या चार तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. विशेष म्हणजे, दोघींवरही एकाच दिवशी आणि एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.

गणपती गल्ली येथील रहिवासी कासाबाई मारोतराव गायकवाड (वय ८५) यांचे २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास मेंदूतील रक्तस्रावामुळे (ब्रेन हॅमरेज) निधन झाले. त्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे दिवंगत संचालक मारोतराव गायकवाड यांच्या पत्नी आणि मुख्याध्यापक टी.एम. गायकवाड यांच्या आई होत्या.

सासू कासाबाई यांच्या निधनाच्या दुःखातून कुटुंबीय सावरत असतानाच नियतीने आणखी एक मोठा आघात केला. दीर्घ आजाराशी झुंज देत असलेल्या त्यांच्या सून पुष्पा पांडुरंग गायकवाड (वय ६७) यांची त्याच रात्री मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. अवघ्या चार तासांच्या अंतराने एकाच घरातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांना मोठा धक्का बसला.

विशेष म्हणजे, सासू कासाबाई आणि सून पुष्पा या दोघींवरही एकाच दिवशी, एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे सासूच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे सुनेच्या मृत्यूची बातमी, अशा दुहेरी आघाताने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन पिढ्यांतील महिलांना एकाच दिवशी अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्यांचेही डोळे पाणावले. या हृदयद्रावक घटनेमुळे मेहकर शहरातील गणपती गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!