देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील आळंद फाटा येथील गणपती मंदिर परिसरात साफसफाईचे काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने मेहुनाराजा येथील एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहुनाराजा येथील रहिवासी ज्ञानदेव मुक्त्ताराम जाधव (वय ६५) हे रविवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या दरम्यान आळंद फाटा येथील गणपती मंदिर परिसरात साफसफाईचे काम करीत होते. यावेळी अचानक त्यांच्या हाताला विषारी सापाने दंश केला. सर्पदंशानंतर त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड झाल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे उपचारासाठी दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ज्ञानदेव जाधव यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मेहुनाराजा गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मृतकांचे नातेवाईक तथा फिर्यादी इंदुबाई उद्धव जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग क्र. २२/२०२६) करण्यात आली आहे. पोलीस ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे हे अधिक तपास करीत आहेत.













