Advertisement Advertisement

बैलगाडी जुंपताना बैलाचे शिंग लागून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू…

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील बोरी अडगाव येथे बैलगाडीला बैलजोडी जुंपत असताना बैलाचे शिंग लागून ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२६ मे) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शांताराम वामन टिकार (वय ७५, रा. बोरी अडगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम टिकार हे सकाळच्या सुमारास आपल्या नेहमीच्या शेतीकामासाठी बैलगाडीला बैलजोडी जुंपत होते. त्यावेळी गावातील एक मोकाट गाय अचानक तेथे आली आणि बैलांच्या अंगावर धावून गेली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे बैल बिथरले व सैरावैरा धावू लागले.

यावेळी बैलांनी मान जोरात हलविल्याने जवळ उभ्या असलेल्या शांताराम टिकार यांच्या गुप्तभागाला बैलाचे शिंग जोरात लागले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे टिकार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी गजेंद्र प्रल्हाद टिकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण फुंडकर हे ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!