अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सिंदखेड राजा तालुक्यातील बार्लिंगा येथून एक महिला व तिचा आठ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्लिंगा येथील अतुल दिनकर भुसारी (वय ३५) यांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १९ मे रोजी रात्री ते शेतात नागरणीसाठी गेले होते. २० मे रोजी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांची पत्नी रूपाली अतुल भुसारी (वय २७) व मुलगा अनिरुद्ध अतुल भुसारी (वय ८) हे घरात आढळून आले नाहीत.
यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र, उशिरापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर अंढेरा पोलीस ठाण्यात दोघांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय मारुती कायंदे हे करीत आहेत.














