खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्राम कुऱ्हा येथे सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आरडाओरड करून असभ्य वर्तन करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोहेका संजय आत्माराम काकडे (वय ५४) यांना डायल ११२ वरून तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदाराने आपल्या बहिणीला तिचा पती दारूच्या नशेत शिवीगाळ करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीस पथकाने पंचांसह ग्राम कुऱ्हा येथे घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आरडाओरड करत असभ्य वर्तन करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव गोविंदा देविदास वाकोडे (वय ३५, रा. पिंप्री देशमुख, ता. खामगाव) असे सांगितले.
यानंतर संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो दारूच्या अमलाखाली असल्याचा अभिप्राय दिला. त्यावरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.












