मेरा बु., (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मोटारसायकलमधील पेट्रोल चोरीला गेल्याच्या संशयावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागणगाव येथील रहिवासी खंडू विश्वनाथ मुंडे (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या एचएफ डिलक्स (एमएच २८ एवाय ४७२०) या मोटारसायकलमध्ये ५०० रुपयांचे पेट्रोल भरले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी तपासली असता पेट्रोल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता पेट्रोल चोरीबाबत संताप व्यक्त करत शिवीगाळ केली.
याचा राग आल्याने शेजारी राहणारा आरोपी रामेश्वर नारायण मुंडे हा हातात बांबूची काठी घेऊन आला. त्याने फिर्यादीच्या डोक्यावर, दोन्ही पायांवर व पाठीवर काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर फिर्यादीने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून रामेश्वर नारायण मुंडे, रेखा रामेश्वर मुंडे व सत्यभामा नारायण मुंडे (सर्व रा. नागणगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













