मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शासनाकडून डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी ग्रामीण भागात डिझेल टंचाईचे वास्तव चित्र समोर येत आहे. मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील एका शेतकऱ्याने डिझेलअभावी थेट बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून पेट्रोल पंप गाठल्याची घटना घडली असून या अनोख्या जुगाडाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांचा ट्रॅक्टर शेतात काम सुरू असतानाच डिझेल संपल्याने बंद पडला. परिसरातील पेट्रोल पंपांवर सलग दोन ते तीन दिवस डिझेल उपलब्ध नसल्याने आणि कॅनमध्ये डिझेल देण्यास मनाई असल्याने टाले यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी बैलगाडीच्या साहाय्याने ट्रॅक्टर ओढत थेट पेट्रोल पंप गाठला आणि डिझेल भरून घेतले.
या प्रसंगी बोलताना टाले यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर टँकरद्वारे डिझेल पुरवठा करण्याची मागणी केली. शेतीची कामे हंगामात तातडीची असतात. अशावेळी डिझेल न मिळाल्यास शेतीची सर्व कामे ठप्प होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पेट्रोल पंप संचालक हमीद कुरेशी यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी मान्य करत शासनाने स्पष्ट धोरण आखण्याची गरज व्यक्त केली. शासनाची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांना मर्यादित प्रमाणात, सुमारे दहा लिटरपर्यंत डिझेल कॅनमधून देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र कॅनमधून डिझेल विक्रीला मुभा दिल्यास साठेबाजी आणि काळाबाजाराचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील डिझेल पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.














