Advertisement Advertisement

शेतकरी नेते स्व.शरद जोशींच्या विचारांना उजाळा; भरोशात जयंतीनिमित्त शेतकरी एकवटले; “शरद जोशी अमर रहे!” या घोषणांनी भरोसा नगरी दुमदुमली…..

चिखली (उद्धव पाटील:बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांची ९२ वी जयंती भरोसा येथे गुरुवारी सकाळी ८ वाजता महादेव मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गावातील शेकडो महिला-पुरुष शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या शेतकरी हिताच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळावे तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, यासाठी शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी चळवळीची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

“शरद जोशी अमर रहे!” आणि “शेतकरी संघटनेचा विजय असो!” अशा घोषणांनी यावेळी महादेव मंदिर परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेली चळवळ अधिक ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केला.

१९८०च्या दशकापासून भरोशाचा शेतकरी चळवळीशी संबंध

भरोसा गावाचा शरद जोशी यांच्या विचारांशी आणि शेतकरी संघटनेच्या चळवळीशी १९८०च्या दशकापासूनच जवळचा संबंध राहिला आहे. शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनांमध्ये गावातील तरुणांसह महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.

शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य आर्थिक मूल्य मिळावे, या मागण्यांसाठी देशभरात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये भरोसा येथील शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

त्यामुळे शरद जोशी यांची जयंती ही केवळ अभिवादनापुरती मर्यादित न ठेवता शेतकरी चळवळीच्या विचारांचे स्मरण आणि ते पुढे नेण्याचा संकल्प म्हणून भरोसा येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला गावातील शेतकरी, महिला, तरुण तसेच शेतकरी संघटनेशी संबंधित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!