खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): वाडी परिसरात रविवारी (२६ एप्रिल) सायंकाळी सुमारे ४ वाजता अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रेल्वेगाडीने गायीला दिलेल्या जोरदार धडकेत गाय बाजूला फेकली जाऊन रेल्वेलाईनजवळ खेळत असलेल्या ११ वर्षीय बालकाच्या अंगावर पडली. या अपघातात बालकाचा जागीच मृत्यू झाला असून गायीचाही मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडी येथील जय माता दी नगर परिसरातील रहिवासी शंकर वावटूळकर यांचा मुलगा युवराज शंकर वावटूळकर (वय ११) हा रेल्वेलाईनलगत खेळत होता. यावेळी रुळावर उभी असलेल्या गायीला येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. धडकेनंतर गाय हवेत उडून बाजूला फेकली गेली आणि ती थेट युवराजच्या अंगावर पडली. यात त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी युवराजला तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी सामान्य रुग्णालयातील कक्षसेवक उमेश पवार यांनी डॉ. शिंगाडे यांच्या सहीचा मेमो खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यावरून पोलिसांनी कलम १९४ बीएनएस अंतर्गत मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ मधुकर पवार करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे वाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










