Advertisement Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडाका! आठवडाभरात १०५ गुन्हे दाखल; १५३ आरोपींवर कारवाई, तब्बल २.१५ कोटींचा मुद्देमाल जप्त….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अवैध दारू, जुगार, अमली पदार्थ, शस्त्र बाळगणे तसेच अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील आठवडाभरात विविध कारवायांमध्ये तब्बल १०५ गुन्हे दाखल करून १५३ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, एकूण २ कोटी १५ लाख ६७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना सर्व संबंधित पथकांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची पथके सक्रिय करण्यात आली असून, संशयित ठिकाणी छापे टाकून अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात आहे.

दारूविक्रीविरोधात ७६ कारवाया….

अवैध देशी-विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टी दारूच्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. या मोहिमेत ७६ गुन्हे दाखल करून ७६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ३ लाख ९२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार अड्ड्यांवरही पोलिसांचा छापा….

जुगारविरोधी कारवाईत जिल्ह्यात २१ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांत ६३ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख ९९ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शस्त्र बाळगणाऱ्यांवरही कारवाई….

आर्म्स अॅक्टअंतर्गत दोन प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चार आरोपींवर कारवाई करत एक पिस्तूल, मॅग्झीन, चाकू, कोयता, दोन मोटारसायकली आणि एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत १ लाख ८६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गांजा बाळगणाऱ्यांवर NDPS Act अंतर्गत गुन्हे….

अमली पदार्थांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. NDPS Act अंतर्गत गांजा बाळगल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ५८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रेती चोरीवर सर्वात मोठा घाव; २ कोटींचा मुद्देमाल जप्त….

अवैध गौण खनिज अर्थात रेती चोरीविरोधातील कारवाईत पोलिसांनी मोठी कारवाई केली. चार प्रकरणांत आठ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, वाहनांसह तब्बल २ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरातील जप्त मुद्देमालाच्या आकडेवारीत रेती चोरीविरोधातील कारवाईचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते.

गणेशोत्सवात कारवाई आणखी तीव्र होणार….

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. अवैध दारू, जुगार, अमली पदार्थ, शस्त्र बाळगणे तसेच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे बुलढाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!