खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच खामगाव तालुक्यात दोन दुर्दैवी घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे. जनुना येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे १२ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पारखेड येथे तलावात बुडून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. शनिवारी, ७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनांमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
जनुना (ता. खामगाव) येथील सक्षम गव्हांदे हा घराबाहेर मित्रांसोबत खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सक्षम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने आणि रॅबीजची लक्षणे दिसून आल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. अवघ्या १२ वर्षांच्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने जनुना गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, सक्षमचा मृत्यू योग्य उपचार न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखा अरुण सावंग यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित शासकीय व खासगी डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय रुग्णालय बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
दुसरीकडे, पारखेड शिवारात युवराज शत्रुघ्न गायकवाड (वय १५) हा ७ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजण्यापूर्वी तलावात बुडाला. याबाबतची माहिती त्याच्या मामाला फोनद्वारे मिळाली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने तलावातून युवराजला बाहेर काढून खामगाव येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पारखेड येथील सचिन पुंडलिक धुळे (वय ३६) यांनी दिलेल्या माहितीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय गोलाईत करीत आहेत.
दिवाळीच्या आनंदावर दोन कुटुंबांवर कोसळलेल्या या दुःखद घटनांनी विरजण पडले असून, दोन्ही गावांत हळहळ व्यक्त होत आहे.














