अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतमोजणी आणि धुऱ्याच्या सीमारेषेवरून सुरू असलेल्या वादातून सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात लोखंडी पास मारून जखमी केल्याची घटना अंढेरा शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर अर्जुन सानप (वय ६५, रा. अंढेरा) आणि त्यांचे भाऊ अशोक अर्जुन सानप यांच्यात शेतीच्या सीमारेषेवरून वाद सुरू आहे. १ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या दरम्यान दामोदर सानप हे त्यांच्या शेतात असताना अशोक सानप हे ट्रॅक्टर घेऊन नांगरणीसाठी आले.
यावेळी नांगरणी सुरू असताना दामोदर सानप यांनी ट्रॅक्टर चालकाला, “शेताची मोजणी झाल्याशिवाय धुऱ्याजवळून नांगरणी करू नको,” असे सांगितले. याचा राग आल्याने अशोक सानप यांनी शिवीगाळ करत दगडाने हातावर मारहाण केली तसेच लोखंडी पासने डोक्यात वार करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला देखील शिवीगाळ करण्यात आली असून, जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दामोदर अर्जुन सानप यांच्या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार यांनी अशोक अर्जुन सानप (रा. अंढेरा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.












