लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील चिखला येथील संतोष काकडे यांनी त्यांच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष काकडे यांची मुलगी तनुजा हिने १४ एप्रिल २०२६ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येमागे ज्ञानेश्वर बुधवत व त्यांची पत्नी स्वाती बुधवत यांच्याकडून होत असलेला मानसिक त्रास, शोषण व कथित अत्याचार कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी तनुजाने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये संबंधित आरोपींची नावे स्पष्टपणे नमूद केल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात बीबी पोलीस स्टेशनमध्ये १७ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
निवेदनात पीडित कुटुंब भयभीत व असुरक्षित वातावरणात जीवन जगत असल्याचे नमूद करण्यात आले असून, आरोपींना तात्काळ अटक करावी, निष्पक्ष तपास करावा, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे तसेच तपासावर कोणताही राजकीय दबाव येऊ देऊ नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही संतोष काकडे यांनी प्रशासनाला दिला आहे.













