देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): विवाहितेला कथितरित्या ‘तलाक-तलाक-तलाक’ म्हणत घराबाहेर काढणे, शिवीगाळ, मारहाण, छळ, धमकी देणे तसेच रोकड हिसकावून घेतल्याप्रकरणी देऊळगाव मही पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना इस्लामपुरा परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून शेख कलीम तारीख शेख (रा. नादी कॉलनी, जालना), शेख कलीम शेख इकबाल (रा. संभाजीनगर) तसेच आणखी एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीचा विवाह सन २०२२ मध्ये शेख कलीम तारीख याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाल्याने आरोपीने कथितरित्या तीन वेळा ‘तलाक’ उच्चारून तिला घराबाहेर काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित महिला माहेरी राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, २९ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास इस्लामपुरा येथे आरोपींनी फिर्यादी व तिच्या आईला शिवीगाळ केली. तसेच एका आरोपीने फिर्यादीसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. शेख कलीम शेख इकबाल याने फिर्यादीच्या आईला ओढाताण करून शिवीगाळ केली तसेच तिच्या पर्समधील ३० हजार रुपये हिसकावून नेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय, या घटनेबाबत कुठेही तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी देऊळगाव मही पोलिसांनी गुन्हा क्रमांक २५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार जाधव यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी कलीम देशमुख करीत आहेत.
टीप : प्रकरण न्यायप्रविष्ट असून आरोपींवरील आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीनुसार आहेत. या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.












