Advertisement Advertisement

बुलढाण्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा ; बिरसिंगपूर येथे मॉडेल डिग्री कॉलेज इमारतीचे भूमिपूजन…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागास असला तरी आता येथे शिक्षण व पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत असून, मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालय यांसारख्या संस्था जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बिरसिंगपूर येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन गुरुवार, १४ मे रोजी ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार संजय गायकवाड, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नागरे, मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. ए. आर. म्हळसने, कार्यकारी अभियंता जे. एन. काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच बिरसिंगपूरच्या सरपंच वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.

ना. प्रतापराव जाधव म्हणाले की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होत आहे. या महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आधुनिक व गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहेत. सुसज्ज इमारतीसोबतच स्विमिंग पूल, क्रीडांगण यांसारख्या आधुनिक सुविधा उभारण्यात येणार असून, यामुळे गुणवंत विद्यार्थी घडून जिल्ह्याचा शैक्षणिक नावलौकिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख करत पंतप्रधान Narendra Modi यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, आतापर्यंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. मात्र, मॉडेल डिग्री कॉलेजमुळे आता जिल्ह्यातच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे व्हावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!