Advertisement Advertisement

मलकापूर पांग्र्यात दिपाली ज्वेलर्सवर मध्यरात्री दरोडा; नाकाबंदीत जालन्यात एक संशयित ताब्यात! शटर कटरने तोडून चोरट्यांनी गल्ला पळविला; दागिने लॉकरमध्ये असल्याने मोठा अनर्थ टळला, पाच जणांचा सीसीटीव्हीत वावर….

मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे:बुलडाणा कव्हरेज न्युज) : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी दिपाली ज्वेलर्स दुकानावर धाड टाकत शटरचे कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ला उचलून नेण्यासोबतच सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी लंपास केला. मात्र दुकानातील मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने लॉकरमध्ये सुरक्षित असल्याने मोठे नुकसान टळले. गल्ल्यातील सुमारे १ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली असता जालना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. रात्री अंदाजे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ईको वाहनातून सुमारे पाच चोरटे दिपाली ज्वेलर्ससमोर आले. त्यांनी कटरच्या साहाय्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले आणि दुकानात प्रवेश केला. जवळपास अर्धा तास दुकानात धुमाकूळ घातल्यानंतर चोरट्यांनी गल्ला आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन चारचाकी वाहनातून पोबारा केला.

दुकानात प्रवेश करताना चोरट्यांनी काचा व इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. एवढेच नव्हे तर परिसरातील शेजारील दुकानांवरील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडून टाकल्याचे समोर आले आहे. मात्र दागिने लॉकरमध्ये ठेवलेले असल्याने चोरट्यांना मौल्यवान दागिने हाती लागले नाहीत.

चोरीचे वाहन घेऊन आले; रस्त्यात वाहन बंद पडल्याने गोंधळ….

दरम्यान, या टोळीने किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन-तीन दिवसांपूर्वी एक वाहन चोरल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच वाहनाचा वापर करून चोरटे मलकापूर पांग्र्यातील दिपाली ज्वेलर्सवर दरोडा टाकून पसार झाले. मात्र किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनाचे चेंबर फुटल्याने वाहन रस्त्यातच खराब झाले.

वाहन खराब झाल्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या वाहनाचा वापर करून जालन्याच्या दिशेने पलायन केल्याचे तपासात समोर येत आहे. ज्या ठिकाणी वाहन बंद पडले, त्या परिसरात गल्ल्यातील काही सामान पडलेले आढळल्याने नागरिकांना चोरीचा संशय आला.

मालकाच्या फोटोमुळे उलगडा….

घटनास्थळी दिपाली ज्वेलर्सचे मालक वसंतराव उदावंत यांचा फोटोही आढळून आला. हा फोटो पाहून नागरिकांनी उदावंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर उदावंत यांनी दुकानाची खात्री केली असता दुकानाचे शटर तुटलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ साखरखेर्डा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच ठाणेदार युवराज रबडे, दुय्यम ठाणेदार संदीप मेदाने, बीट जमादार निवृत्ती पोकळे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. बुलढाणा येथील फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपासाला वेग दिला.

नाकाबंदीत जालन्यात एक संशयित ताब्यात…..

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विविध मार्गांवर नाकाबंदी केली. या कारवाईदरम्यान जालना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

चोरट्यांचा संपूर्ण वावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, त्यावरून पोलिसांकडून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. चोरीसाठी वापरलेले वाहन, त्यानंतर चोरट्यांनी केलेला वाहन बदल आणि जालन्याच्या दिशेने केलेले पलायन या सर्व बाबींचा पोलिस तपास करीत आहेत.

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार संदीप मेदाने व बीट जमादार निवृत्ती पोकळे करीत आहेत.

दिपाली ज्वेलर्स चौथ्यांदा चोरट्यांच्या निशाण्यावर…..

मलकापूर पांग्रा येथील दिपाली ज्वेलर्स हे दुकान यापूर्वीही चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहे. आतापर्यंत चौथ्यांदा दुकान फोडण्याचा प्रकार घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही दुकान फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी मात्र मौल्यवान दागिने लॉकरमध्ये सुरक्षित असल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. परंतु चोरट्यांनी दुकानातील काचा, साहित्य तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने दुकानदाराचे नुकसान झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!