शिंदीतील सरकारी जमीन नोंद प्रकरणाला मोठे वळण! तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शिंदी येथील सरकारी एफ-क्लास जमिनीची नोंद वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याच्या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर सिताराम काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
शिंदी येथील सरकारी जमिनीची नोंद वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ही नोंद नियमानुसार करण्यात आली होती का, त्यासाठी ग्रामपंचायतीचा आवश्यक ठराव होता का आणि शासकीय जमिनीच्या नोंदीत अनियमितता झाली का, असे प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात दिनकर काळे यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू असून, त्यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी सिंदखेडराजा न्यायालयाने दिनकर काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश साखरखेर्डा पोलिसांना दिले होते. त्यानुसार, त्याच दिवशी सायंकाळी ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काळे यांनी वकिलामार्फत ५ ऑक्टोबर रोजी मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर फिर्यादी पक्षाने हरकत नोंदवली होती. अखेर १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने अर्ज नामंजूर केल्याने या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात सरकारतर्फे अॅड. चौधरी यांनी, तर आक्षेपकर्त्यांच्या वतीने अॅड. निशिकांत राजे जाधव आणि अॅड. पुरुषोत्तम सुरडकर यांनी बाजू मांडली. सरकारी जमिनीच्या नोंदीशी संबंधित या प्रकरणात आता पुढे काय घडते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.















