Advertisement Advertisement

BREAKING :ज्या बापानं घास भरवला, त्याच बापावर पोरानं वार केला! उमाळीत बापलेकाच्या नात्याला काळिमा; आईनं चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट उपसले; मात्र त्याच जन्मदात्या वडिलांची हत्या झाल्याच्या घटनेने मलकापूर तालुक्यातील उमाळी गाव हादरले आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात अवघ्या १९ वर्षीय मुलावर आपल्या ५० वर्षीय वडिलांची हत्या केल्याचा आरोप असून, या कृत्यासाठी आईनेच मुलाला चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घरातील वादाने घेतले गंभीर वळण!

मृत सोपान नामदेव चव्हाण (वय ५०) आणि त्यांचा मुलगा दीपक सोपान चव्हाण (वय १९) यांच्यात मुलगा कामधंदा करीत नसल्याच्या कारणावरून वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यापूर्वी सोपान चव्हाण यांना त्यांची पत्नी आशा चव्हाण हिने रस्त्यावर मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री पुन्हा बापलेकामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर हल्ल्यात झाल्याचा आरोप असून, दीपकने धारदार हत्याराने वडिलांच्या हनुवटीवर आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात सोपान चव्हाण यांचा मृत्यू झाला.

आईने चिथावणी दिल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

या घटनेला आणखी गंभीर वळण मिळाले असून, वडिलांच्या हत्येसाठी आई आशा चव्हाण हिनेच मुलाला चिथावणी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मृताचे नातेवाईक भागवत नामदेव चव्हाण (वय ५५) यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दीपक चव्हाण आणि आशा चव्हाण या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या घटनेमागील नेमकी कारणे आणि आईच्या कथित सहभागाबाबत तपासातून काय समोर येते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!