साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरात एकटी असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करीत तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये घडली. महिलेच्या आरडाओरड्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज संस्थानमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या निर्मला रामचंद्र पंचाळ (वय ६०) या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी स्वयंपाकाचे काम आटोपून घरी परतल्या होत्या. यावेळी त्या घरात एकट्याच असल्याची संधी साधून त्याच वार्डातील शेख सोरभ शेख रहीम ऊर्फ शेरा हा तोंडाला काळा रुमाल बांधून चोरीच्या उद्देशाने घरात घुसला. त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून निर्मला पंचाळ यांना मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरात नेऊन त्यांच्या तोंडात पायपुसणी कोंबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. या झटापटीदरम्यान आरोपीने महिलेच्या नाकातील नथ ओरबाडली आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे वार्ड क्रमांक ६ मध्ये खळबळ उडाली असून, वृद्ध महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी शेख सोरभ शेख रहीम ऊर्फ शेरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. घरात एकट्या असलेल्या महिलेला लक्ष्य केल्याच्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.













