साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली आगारातून चिखली–हिवरागडलिंग–चिखली ही नवीन एसटी बससेवा आजपासून सुरू करण्यात आली. या बससेवेच्या शुभारंभानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने बसचे पूजन करून चालक व वाहक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर नियमित बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः हिवरागडलिंग व परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सावखेड नागरे येथे शिक्षणासाठी जात असल्याने नियमित वाहतूक सेवेची गरज निर्माण झाली होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळी ८.३० वाजता ही बस चिखली येथून सुटून लव्हाळा, साखरखेडा, शेंदुरजन, हिवरागडलिंग, आगेफळ, झोटिंगा, मलकापूर पांग्रा, सावखेड नागरे, शिवणी आरमाळ, अंढेरा, अंढेरा फाटा आणि मेरा चौकी मार्गे पुन्हा चिखली येथे पोहोचणार आहे.
तर परतीच्या प्रवासासाठी ही बस दुपारी ३ वाजता चिखली येथून सुटून अंढेरा, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे, मलकापूर पांग्रा, झोटिंगा, आगेफळ, हिवरागडलिंग, शेंदुरजन, साखरखेडा, लव्हाळा मार्गे पुन्हा चिखली येथे येणार आहे.
ही बससेवा सुरू करण्यासाठी हिवरागडलिंग येथील मुख्याध्यापक तथा सरपंचपती अनंतकुमार खरात यांच्या पुढाकारासह ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच चिखली आगार प्रमुख जोगदंड यांनी संवेदनशील भूमिका घेत सहकार्य केल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची वाहतुकीची अनेक वर्षांची समस्या अखेर मार्गी लागली आहे. बससेवा सुरू झाल्याने शिक्षण, दैनंदिन प्रवास आणि इतर कामांसाठी या मार्गावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
















