जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज): जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप उत्तमराव मोरे (वय ५२) यांना आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पूर्ण झालेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जळगाव जामोद तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ३ जुलै २०२६ रोजी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत दोन नाली बांधकामे आणि एका अंतर्गत रस्त्याचे असे एकूण तीन विकासकामे सन २०२५-२६ मध्ये पूर्ण केली होती. या कामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी बिलाच्या रकमेच्या तीन टक्के कमिशनप्रमाणे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ACBकडे धाव घेतली. त्यानंतर १५ जुलै २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान संदीप मोरे यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACBने सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपी अधिकाऱ्याला २५ हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर संदीप मोरे यांनी ती स्वतःच्या ताब्यात स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या ACBच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.
या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACBने दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड, पोलीस निरीक्षक रवींद्र सखरे, पोलीस निरीक्षक श्यामलाल निरछे, पोलीस अंमलदार अभय वाघ, वैभव चापले, मोहिन ठाकरे आणि चालक पोलीस अंमलदार राजेश बहेरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन ACBने केले आहे.












