Advertisement Advertisement

आन्वीतील ई-क्लास शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी प्रशासन झुकले; लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे! २५ ऑगस्टपर्यंत अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन; भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): मौजे आन्वी येथील शासकीय ई-क्लास जमिनीवरील पुनरतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या सकारात्मक हस्तक्षेपानंतर मागे घेण्यात आले. पंचायत समिती चिखलीचे विस्तार अधिकारी मोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते, सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांच्यात चर्चा घडवून आणली. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आन्वी येथील शासकीय गट क्रमांक १८९ व १९० या ई-क्लास जमिनीवर पुन्हा बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी १३ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत १४ जुलै रोजी विस्तार अधिकारी मोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्ते रमेश चांगदेव पवार व इतर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी वादग्रस्त जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी पेरणी झाल्याचे निदर्शनास आले.

२५ ऑगस्टपर्यंत अतिक्रमण हटविणार….

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, शासकीय सातबारा उताऱ्यावरील नोंदीप्रमाणे असलेले अतिक्रमण महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यातील कलम १५३ अन्वये कारवाई करून २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी पूर्णपणे हटविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच पाण्याच्या टाकीजवळील एन.पी. नोंदीनुसार असलेले अतिक्रमणही काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुन्हा अतिक्रमण होऊ नये, ग्रामपंचायतीची जबाबदारी

भविष्यात या शासकीय जागेवर पुन्हा कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची संपूर्ण कायदेशीर देखरेख व नियंत्रणाची संयुक्त जबाबदारी ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांच्यावर राहणार असल्याचेही लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे.

या आश्वासनानंतर उपोषणकर्ते रमेश चांगदेव पवार, किसन नारायण पवार, भगवान खुशालराव पवार, दत्तात्रय संतोषराव पवार यांच्यासह सर्व आंदोलनकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. याप्रसंगी आन्वीचे सरपंच, ग्रामपंचायत सचिव आणि पंचायत समिती चिखलीचे विस्तार अधिकारी मोरे यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्रही प्रसिद्ध करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!