चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावरील चिखली बायपासच्या वळणावर एका टिप्पर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. समोर नादुरुस्त स्कुलबस आल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणार्धात निर्णय घेत टिप्पर रस्त्यावरील दुभाजकावर चढवला. त्यामुळे स्कुलबसमधील विद्यार्थ्यांना कोणतीही इजा न होता संभाव्य भीषण अपघात टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २८ एबी ९९१५ क्रमांकाचा रेतीने भरलेला टिप्पर खामगाव-जालना मार्गावरील चिखली बायपासवरून जात होता. त्याचवेळी रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभी असलेली स्कुलबस चालकाच्या समोर आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत टिप्पर चालकाने वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर वळवले. त्यामुळे स्कुलबसला धडक बसली नाही आणि बसमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.
घटनेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, संबंधित टिप्परमधील रेतीची वाहतूक कायदेशीर असून त्याची रॉयल्टी भरलेली असल्याची माहितीही समोर आली आहे.










