बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर आता कायद्याचा थेट बडगा उगारला जाणार आहे. वाढते रस्ते अपघात आणि वाहतूक नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन लक्षात घेता वाहतूक विभागाने कठोर कारवाईचा इशारा दिला असून, अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालविताना आढळल्यास संबंधित पालक किंवा वाहनमालकाविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून परवान्याशिवाय दुचाकी चालविण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अनेक पालक स्वतःच मुलांच्या हातात वाहनाच्या चाव्या देत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना आढळल्यास संबंधित पालक किंवा वाहनमालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. अशा प्रकरणात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि संबंधित वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. याशिवाय संबंधित अल्पवयीन मुलाला वयाची अट पूर्ण झाल्यानंतरही काही कालावधीपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
वाहतूक विभागाने पालकांना स्पष्ट इशारा देत, “मुलांचा हट्ट म्हणून वाहन देऊ नका. एका चुकीच्या निर्णयामुळे मुलांचे भविष्य आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत येऊ शकते,” असे आवाहन केले आहे.
दरम्यान, जिल्हाभरात अल्पवयीन वाहनचालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखविण्यात येणार नसल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांनी जबाबदारीने वागून अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.










