चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरात निकृष्ट दर्जाच्या व रासायनिक प्रक्रियेतून तयार करण्यात आलेल्या बनावट खव्याचा वापर करून मिठाई तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळातच नव्हे तर वर्षभर अनेक स्वीटमार्टमध्ये अशा प्रकारच्या खव्याचा वापर होत असल्याची चर्चा असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागांतील काही स्वीटमार्टमध्ये संशयास्पद खव्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप आहे. या खव्याचा वापर पेढे, बर्फी आणि इतर दुग्धजन्य मिठाई तयार करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकांना शुद्ध मिठाईच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अन्न व औषध प्रशासनाने नियमितपणे मिठाई व खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. तसेच संशयित स्वीटमार्टवर अचानक छापे टाकून बनावट खव्याचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावे. संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची चर्चा…
शहरात बनावट खव्याचा पुरवठा करण्यासाठी काही पुरवठादारांचे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण साखळीचा शोध घेऊन पुरवठादार आणि संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आरोग्यावर परिणाम होण्याची भीती….
रासायनिक पदार्थांपासून तयार झालेल्या निकृष्ट खव्याचा वापर झाल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी परवानाधारक व विश्वासार्ह दुकानांमधूनच खरेदी करावी, तसेच संशयास्पद बाबी आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.












