उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नागपूर येथे संदल कार्यक्रमासाठी जात असताना शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना तोल जाऊन गंभीर जखमी झालेल्या उदयनगर येथील २८ वर्षीय युवकाचा उपचारासाठी अकोला येथे नेत असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ११ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेगाव रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे उदयनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदयनगर येथील रईस खान अनिस खान (वय २८) हे मशिद परिसरात किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नागपूर येथे आयोजित संदल कार्यक्रमासाठी जाण्यासाठी ते शेगाव रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेत चढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते रेल्वेखाली पडले.
या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली तसेच शरीरालाही जबर मार लागला. उपस्थितांनी तातडीने त्यांना उपचारासाठी अकोला येथे रवाना केले. मात्र, बाळापूरजवळ पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
रईस खान यांच्यावर १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उदयनगर येथील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता तरुण अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या गरीब कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.












