देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जालना येथून दुचाकीने गावी परतत असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ जून रोजी रात्री असोला फाट्याजवळ घडली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत युवकाचे नाव ऋषीकेश गजानन भागीले (वय २७, रा. टाकरखेड भागीले) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश भागीले हे २७ जून रोजी रात्री एमएच-२०-एपी-२५४५ क्रमांकाच्या दुचाकीने जालना येथून आपल्या गावी परतत होते. रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास असोला फाटा येथील नागरे पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात ऋषीकेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने जखमीला मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी मृताचे मावसभाऊ रावसाहेब गणेश डोके (रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विश्वनाथ काकड पुढील तपास करीत आहेत.














