Advertisement Advertisement

धक्कादायक! “२४ तासांत जिल्ह्यात चार महिला बेपत्ता!; नर्सिंग, बीएससी, बी.फार्मच्या विद्यार्थिनींसह विवाहितेचा शोध सुरू…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार महिला बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. यामध्ये नर्सिंग, बीएससी आणि बी.फार्मचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनींसह एका विवाहितेचा समावेश असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंगच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शौचालयाच्या खड्ड्याच्या मातीवरून झालेल्या किरकोळ वादातून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटनाही समोर आली आहे.

बुलढाणा शहरात नर्सिंग विद्यार्थिनी बेपत्ता….

नांदुरा तालुक्यातील १९ वर्षीय तरुणी बुलढाणा येथील एका महाविद्यालयात नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. २४ जून रोजी वसतिगृहाला सुटी असल्याने ती घरी जाण्यासाठी निघाली होती. दुपारी तिने वडिलांना फोन करून आपण बुलढाणा बसस्थानकावर असून बसमध्ये बसत असल्याचे सांगितले. मात्र ती घरी पोहोचली नाही. तिचा मोबाईलही बंद लागत असल्याने वडिलांनी तक्रार दिली असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

पेपर द्यायला गेलेली बीएससी विद्यार्थिनीही गायब…

चिखली तालुक्यातील सावरगाव परिसरातील १९ वर्षीय विद्यार्थिनीला तिच्या वडिलांनी २४ जून रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी सोडले होते. पेपर संपल्यानंतर तिला घेण्यासाठी गेले असता ती कॉलेजमधून बाहेरच आली नाही. कॉलेज परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने चिखली पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

माहेरी राहणारी विवाहिताही बेपत्ता….

मूळ जालना जिल्ह्यातील ३२ वर्षीय विवाहिता कौटुंबिक वादामुळे एप्रिलपासून बुलढाणा येथे माहेरी राहत होती. २४ जून रोजी घरातील सदस्य बाहेर असताना ती बॅग आणि कपडे घेऊन घरातून निघून गेली. त्यानंतर तिचा मोबाईल बंद लागत असून भावाच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

मेहकरातील बी.फार्म विद्यार्थिनीचा शोध सुरू…

लोणार तालुक्यातील २२ वर्षीय तरुणी मेहकर येथील महाविद्यालयात बी.फार्मच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. ती भाड्याच्या खोलीत राहत होती. २४ जून रोजी घरी जात असल्याचे सांगून निघाल्यानंतर ती घरी पोहोचली नाही. सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळाल्याने मेहकर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

शौचालयाच्या खड्ड्याच्या मातीवरून वाद; पती-पत्नीला मारहाण…..

रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संडासासाठी खोदलेल्या खड्ड्याची माती शेजाऱ्यांच्या जागेत पडल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादीला लाकडी काठीने मारहाण केली. पत्नी सोडवण्यासाठी आली असता तिचे केस ओढून तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!