Advertisement Advertisement

“बिबट्यानं रात्रीचं धाड टाकली अन् दोन शेळ्या फस्त केल्या! चार कुत्रीही गायब; मंगरूळ नवघरेत भीतीचं सावट”

मंगरूळ नवघरे (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मंगरूळ नवघरे गावाच्या उत्तरेस असलेल्या शेळीच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून दोन मोठ्या शेळ्या ठार केल्याची धक्कादायक घटना १२ जून रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेत शेळीपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्ताक खा मने का पठाण (वय ५८) हे शेती व शेळीपालन व्यवसाय करतात. गावाच्या उत्तरेकडील भागात त्यांचा शेळ्यांचा गोठा असून गोठ्यालगतच त्यांचे राहते घर आहे. १२ जून रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ते गोठ्याकडे गेले असता दोन मोठ्या शेळ्या व दोन पिल्ले मृत अवस्थेत आढळून आली. या प्रकारामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

विशेष म्हणजे, गोठ्याच्या परिसरात नेहमी वावरणारी चार कुत्रीही बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता अधिक बळावली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुस्ताक पठाण यांनी वन विभागाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. प्राथमिक पाहणीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वन विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे.

या हल्ल्यात झालेल्या नुकसानीमुळे मुस्ताक पठाण यांनी वन विभागाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. दरम्यान, परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“रात्री बिबट्याची दबक्या पावलांनी एंट्री; सकाळी गोठ्यात दिसलं मृत्यूचं थैमान!” अशी चर्चा सध्या मंगरूळ नवघरे परिसरात रंगू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!