Advertisement Advertisement

“चिखलीचं नाव देशभर गाजलं! अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजला यूजीसीचा ‘स्वायत्त’ बहुमान”! अभ्यासक्रम, परीक्षा आणि कौशल्याधारित शिक्षणात मोठे बदल; विद्यार्थ्यांना मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचीच पदवी मिळणार….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखलीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी मोठी उपलब्धी अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने मिळवली आहे. केंद्र शासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महाविद्यालयाला स्वायत्त (Autonomous) दर्जा प्रदान केला असून, त्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीला नवे बळ मिळाले आहे. तीन दशकांहून अधिक काळ गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा हा महत्त्वपूर्ण सन्मान मानला जात आहे.

स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे आता महाविद्यालयाला बदलत्या औद्योगिक, तांत्रिक आणि जागतिक गरजांनुसार स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याचे, त्यात वेळोवेळी आवश्यक बदल करण्याचे, कौशल्याधारित, बहुविषयक आणि उद्योगाभिमुख नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच स्वतंत्र परीक्षा व मूल्यमापन प्रणाली राबविण्याची मुभाही संस्थेला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक, व्यावहारिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचा लाभ होणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पदवीच प्रदान केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाची मान्यता कायम राहणार असून, त्याचबरोबर स्वायत्त संस्थेच्या आधुनिक अभ्यासक्रमाचा आणि शैक्षणिक लवचिकतेचाही लाभ विद्यार्थ्यांना मिळेल.

या स्वायत्ततेमुळे संशोधन, नवसंशोधन, पेटंट, स्टार्टअप, उद्योजकता आणि नवीन उत्पादन विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील समन्वय वाढवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वाशी जोडण्यासही या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना १९९३ मध्ये संस्थेचे संस्थापक कर्मयोगी सिद्धिविनायक बोंद्रे यांच्या दूरदृष्टीतून करण्यात आली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्लीची मान्यता असलेले हे महाविद्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी कायम संलग्न असून, गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासाठी विदर्भात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात संस्थेला यश आले आहे.

यूजीसीकडून मिळालेला स्वायत्त दर्जा हा केवळ संस्थेचा सन्मान नसून, चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या निर्णयामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणारे अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे….

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!