सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): कोचिंग क्लाससाठी प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा चालत्या बसमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ८ जून रोजी घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस पोस्टेच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षे ११ महिने वयाची विद्यार्थिनी शेगाव येथील उमाळे सरांच्या कोचिंग क्लाससाठी बावनबीर येथून बसने जात होती. दरम्यान, चार आरोपींनी संगनमत करून तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, बसमध्ये प्रवासादरम्यान एका आरोपीने विद्यार्थिनीला वाईट उद्देशाने स्पर्श करून तिचा उजवा हात पकडला. तसेच इतर तीन आरोपींनी दुचाकी, ऑटो आणि बसच्या माध्यमातून पाठलाग करत संबंधित आरोपीला मदत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने तातडीने सोनाळा पोलीस पोस्टेत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी प्रथमेश सुरेश महल्ले (रा. शेलू, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला), सौरभ हटकर (रा. भेंडीसुतर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला), कृष्णा संतोष गावंडे (रा. भेडगाव, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) आणि शिवा हटकर (रा. बावनबीर, ता. संग्रामपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित तपास सोनाळा पोलीस पोस्टेचे प्रभारी ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे














