चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपलेल्या तसेच मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार चिखली तालुक्यात सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ६० ग्रामपंचायती आणि एका नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीसह एकूण ६१ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षणासाठी १० व ११ जून २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६२ अधिकारी व अतिरिक्त ३ अशा एकूण ६५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच ग्रामसभेचे इतिवृत्त आणि अहवाल त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
८ जूनला प्रशिक्षण; उपस्थिती बंधनकारक
आरक्षण प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ६५ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ८ जून रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सुमारे १२७ अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
प्रशिक्षणास सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.












