कोल्हापूर (कव्हरेज ग्रुप नेटवर्क): राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकरासह चौघांनी तब्बल दहा महिन्यांपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजीत मुधोळकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके हा राधानगरी येथे फोटोग्राफी व्यवसाय करतो.
व्यवसायाच्या निमित्ताने त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आदित्यने तरुणीशी जवळीक साधून तिचे खासगी व्हिडिओ आणि फोटो चित्रित केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपीने हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर दबाव टाकला. तसेच तिला आपल्या मित्रांशी संपर्क ठेवण्यास भाग पाडले. यानंतर इतर आरोपींनीही धमकावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पीडित तरुणीला अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची भीती दाखवून गेल्या दहा महिन्यांपासून तिचे शोषण करण्यात आल्याचा आरोप असून या गंभीर घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुरगूड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींच्या मोबाईल, डिजिटल पुरावे आणि इतर बाबींची छाननी सुरू आहे. तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













