मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीसाठी मलकापूरला जात असल्याचे सांगून घरातून निघालेली दाताळा येथील ३० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
दाताळा येथील कोळीवाडा परिसरातील रहिवासी सौ. सविता उखा वरकडे (वय ६०) यांनी याबाबत मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, सौ. आशा निवृत्ती चंडोल (वय ३०), मूळ रा. टिटवी, ता. सोयगाव, जि. संभाजीनगर तथा सध्या रा. कोळीवाडा, दाताळा या २६ मे रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घरातून निघाल्या होत्या.
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्याने ई-केवायसी करण्यासाठी मलकापूरला जात असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र त्या घराबाहेर पडल्यानंतर परत आल्याच नाहीत. नातेवाईकांनी गावासह विविध ठिकाणी शोध घेतला, परंतु त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
बेपत्ता महिलेची उंची सुमारे ५ फूट असून रंग सावळा आहे. अंगात पिवळ्या रंगाची लाल डिझाइन असलेली साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज, कपाळावर काळी गोंदलेली टिकली, लांब काळे केस, पायात गुलाबी रंगाची सँडल तसेच गळ्यात सोन्याची पोत व कानात रिंगा असल्याचे वर्णन देण्यात आले आहे.
सदर वर्णनाची महिला कुठेही आढळून आल्यास तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात मिसिंग क्र. १०/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टाकरखेडे करीत आहेत.













