Advertisement Advertisement

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व दीराविरुद्ध गुन्हा…

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : तालुक्यातील धानोरा येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी पती व दीराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत विवाहितेचे नाव कांचन देवानंद हनवते (रा. धानोरा) असे आहे. त्यांचा विवाह सुमारे सहा वर्षांपूर्वी देवानंद महादेव हनवते याच्यासोबत झाला होता.

याप्रकरणी फिर्यादी गणेश शांताराम इंदोरे (रा. रेल, ता. अकोट) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पती देवानंद हनवते व दीर दीपक महादेव हनवते हे किरकोळ कारणांवरून कांचन यांना सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत होते. भाजीत मीठ कमी पडणे, टीव्ही पाहणे तसेच घरकामाच्या कारणांवरून त्यांना मारहाण व शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सासरच्या सततच्या छळाला कंटाळून कांचन हनवते यांनी २७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे धानोरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी आरोपी देवानंद महादेव हनवते व दीपक महादेव हनवते यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८, ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत असून, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!