बुलडाणा ( बुलडाणा कव्हरेज न्युज):बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत तब्बल १९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २१ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये १७ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बेपत्ता व्यक्तींमध्ये १८ वर्षीय तरुणीपासून ते ८८ वर्षीय वृद्ध महिलेपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांचा समावेश असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील खामगाव, चिखली, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा आदी तालुक्यांमधून या व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये घरातून निघून गेल्यानंतर संपर्क तुटला असून, काही जण अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे. वाढत्या बेपत्ता घटनांमुळे पोलिस प्रशासनासमोर शोधमोहीमेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
बेपत्ता झालेल्यांमध्ये पायल ओम पुरी, शारदा गव्हाळे, श्वेता शिरसाट, नर्मदा ठेंग, पूजा पवार, गोदावरी फडके, नाजनीनबी शहा, सुभाष डोसे, कोमल वानखेडे, अरुण जाधव, कुसुम ध्रुव, स्वीटी हिवराळे, प्रतिभा खरात, विदया ससाणे, कल्याणी वसतकार, रुपाली मगर, अशमाल शेख, आश्विनी बोरसे, तन्वी बोरसे व शबाना सैय्यद यांचा समावेश आहे. सर्व संबंधित पोलीस ठाण्यांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, सामाजिक माध्यमांवर या बेपत्ता व्यक्तींचे फोटो आणि माहिती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच पुढे पाठवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणाला यापैकी कोणतीही व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपत्ता झाल्याच्या घटनांमुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणांचा गांभीर्याने तपास सुरू केला असून, लवकरच बेपत्ता व्यक्तींचा शोध लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













