Advertisement Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी डोणगावमधे भरले डिझेल ! ते केव्हा आले वाचा बातमी…

डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यभर पेट्रोल-डिझेल टंचाईचा मुद्दा तापलेला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी ते नागपूर हा प्रवास हेलिकॉप्टर किंवा विमानाऐवजी कारने करत ‘इंधन बचती’चा संदेश दिला. २३ मे २०२६ रोजी समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांनी डोणगाव येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर रात्री सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान ताफ्यात डिझेल भरून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे शिर्डी येथील एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंधन वाचवा’ संदेशाला प्रतिसाद देत हवाई प्रवास टाळून समृद्धी महामार्गाने नागपूरकडे प्रस्थान केले. बुलढाणा जिल्ह्यातून त्यांच्या ताफ्याचा तब्बल ८७ किलोमीटरचा प्रवास झाला.

दरम्यान, डोणगाव येथील भारत पेट्रोलियम पंपावर मुख्यमंत्री ताफा काही काळ थांबला. यावेळी ताफ्यातील वाहनांमध्ये डिझेल भरल्यानंतर ताफा पुढे रवाना झाला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सध्या बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये इंधन उपलब्धतेबाबत चिंता वाढत असताना प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी स्वतः विविध पेट्रोल पंपांना भेटी देत आढावा घेत आहेत.

अशातच मुख्यमंत्री ताफ्याने डोणगाव येथील पेट्रोल पंपावर थांबून डिझेल भरल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. “समृद्धी महामार्गावर इंधनाची कमतरता नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न होता का?” असा सवालही काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!