बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर येथील खतांचा काळाबाजार आणि शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कृषी विभाग आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आला आहे. जिल्हा परवाना प्राधिकारी संतोष डाबरे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र चालकांना कडक शब्दांत इशारा देत गैरप्रकार सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
संतोष डाबरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानित खतांमध्ये कोणतीही अनियमितता, काळाबाजार किंवा बनावट नोंदी आढळल्यास संबंधित कृषी केंद्रावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. ई-पॉस (E-POS) मशीनवरील खतांचा साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यामध्ये कोणतीही तफावत आढळू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच शेतकऱ्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून बनावट खत विक्री नोंदी केल्याचे समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परवाना संपलेली (Expiry) खते किंवा कीटकनाशके आढळल्यास ती तात्काळ जप्त करून संबंधित कृषी केंद्राविरोधात कारवाई केली जाईल.
याशिवाय परवाना नसलेली, लेबलमध्ये तफावत असलेली किंवा संशयास्पद उत्पादने विक्रीसाठी ठेवल्यास थेट विक्री बंदी घालण्यात येणार असल्याचा इशाराही कृषी विभागाने दिला आहे. साठा रजिस्टर अपूर्ण ठेवणे, नियमांचे उल्लंघन करणे किंवा माहिती लपविणाऱ्या कृषी केंद्रांचा परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, असेही डाबरे यांनी स्पष्ट केले.
“अजंठा अॅग्रो सर्व्हिसेस”वर झालेली कारवाई ही केवळ सुरुवात असून, आगामी खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व कृषी केंद्र चालकांनी खत विक्री आणि साठा व्यवस्थापन पूर्णपणे पारदर्शक ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.















