मलकापूर पांग्रा (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील पेट्रोल पंपावर रविवारी मध्यरात्री डिझेल भरण्यासाठी लागलेल्या रांगेत नंबर लावण्याच्या कारणावरून जोरदार वाद होऊन हाणामारीची घटना घडली. पेट्रोल व डिझेलच्या अनियंत्रित वितरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू असल्याने ट्रॅक्टर, पंप तसेच विविध शेती यंत्रांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोलची गरज भासत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून शेतकरी व वाहन चालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, रविवारी रात्री पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर दाखल झाल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. यावेळी डिझेल भरण्यासाठी लागलेल्या रांगेत एका वाहन चालकाने मध्येच गाडी घुसवल्याने वाद निर्माण झाला. बराच वेळ रांगेत उभ्या असलेल्या वाहन चालकांनी संबंधिताला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. उपस्थितांनी संबंधिताला मारहाण केल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गर्दी पांगवली. या प्रकारामुळे काही काळ पेट्रोल पंप परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, परिसरात अवैध पेट्रोल विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. सामान्य वाहन चालकांना पेट्रोल-डिझेलसाठी तासन्तास रांगेत थांबावे लागत असताना काही जण मोठ्या कॅनमध्ये इंधन साठवून काळ्या बाजारात विक्री करत असल्याचा आरोप होत आहे. १०५ रुपयांचे पेट्रोल १४० ते १६० रुपये लिटर दराने विकले जात असल्याचेही सांगितले जात आहे.
तसेच अनेक पेट्रोल पंपांवर साध्या पेट्रोलऐवजी महागडे ‘स्पीड’ पेट्रोल घेण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकला जात असल्याची तक्रार वाहन चालकांनी केली आहे. स्पीड पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे दहा रुपयांनी अधिक असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या संपूर्ण प्रकाराची प्रशासनाने चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.














